रत्नागिरी तालुक्यातील बोरभाटले-नाखरे परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत २३ वर्षीय तरुणीचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला आहे. लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (वय २३, रा. नाखरे, मूळ रा. कर्नाटक) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ही तिच्या कुटुंबासह रत्नागिरी तालुक्यात वास्तव्यास होती.
घटनेच्या दिवशी ती घरात चुलीवर कुकरमध्ये डाळ शिजवत होती. डाळ शिजल्यानंतर कुकर खाली उतरवत असताना तिला अचानक चक्कर आली. त्यामुळे तिच्या हातातील कुकर खाली पडला आणि त्यातील उकळती गरम डाळ तिच्या चेहऱ्यावर, हनुवटीवर तसेच दोन्ही हातांच्या मनगटांवर उडाली. या अपघातात ती गंभीररीत्या भाजली.
घटनेनंतर तिच्या वडिलांनी, हल्लेपा सिद्रमाप्पा बुदीहल यांनी तातडीने घरीच प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढील काही तासांत तिच्या जखमा अधिक वाढल्या आणि तिची प्रकृती खालावू लागली.
बुधवार, १३ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता ती बेशुद्ध पडली.
त्यानंतर तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सापुचेतळे (ता. लांजा) येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दुपारी २:२५ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चक्कर येणे आणि अचानक झालेला अपघात यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १७/२०२६) करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













