चिपळूण : नगरपरिषदेसमोर विंगर उभी करून वाहतुकीला अडथळा, पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत अन् शिवीगाळ, एकावर गुन्हा

banner 468x60

चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी केल्याप्रकरणी तसेच वाहन बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ व हातवारे केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रितेश प्रकाश शिंदे (वय ३८, रा. पोलिस वसाहत, चिपळूण) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित काशिनाथ महागावकर (वय ४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागावकर याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची विंगर बस (एमएच ०३ ईएस ५४६२) चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर उभी केली होती. या वाहनामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसह पादचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. परिणामी वाहतुकीवरही परिणाम होत होता.

याचदरम्यान शहरात गस्त घालत असलेले पोलिस कर्मचारी प्रितेश शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित विंगर बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी महागावकर याने पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत धमकीच्या स्वरूपात बोलणे, हातवारे करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून अपमान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३३ वाजता चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *