रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या 22 वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, 23 तासांनी सापडला मृतदेह

banner 468x60

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथे घडली. अथर्व राजेश देसाई असे मृत युवकाचे नाव आहे. पोहता येत नसतानाही तो खाडीच्या पाण्यात उतरला. यावेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो बुडाला. तब्बल २३ तासांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाला त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने मेढे-मांजरे परिसरावर शोककळा पसरली आहे.

अथर्व हा मुंबईत वास्तव्यास होता. गणेशोत्सवानिमित्त तो आपल्या पालकांसह मेढे-मांजरे कळकदेकोंड येथे गावी आला होता. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई आणि वेदांत मनीष देसाई या मित्रांसोबत जांभळी बंदर येथे गेला होता. मित्रांसोबत पाण्यात जाण्याची माहिती त्यांनी घरातील कोणालाही दिली नव्हती.

ओहोटीच्या प्रवाहात अथर्व बुडाला

जांभळी बंदर येथे पोहोचले त्यावेळी खाडीला ओहोटी सुरू होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाहही जोरदार होता. अथर्वला पोहता येत नव्हते, तर त्याचे मित्रही पोहण्यात फारसे तरबेज नव्हते. मात्र, अथर्व पाण्यात उतरला आणि काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला.

अथर्व बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे मित्र घाबरले. त्यांनी तातडीने वाडीत धाव घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अथर्वचे पालक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी खाडीत उतरून त्याचा शोध सुरू केला. मात्र, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि अंधारामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या.

पोलिसांकडून रात्रभर शोधमोहीम

घटनेची माहिती डिंगणी पोलीस दूरक्षेत्राला देण्यात आली. त्यानंतर संगमेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर आणि होमगार्ड यांच्यासह ग्रामस्थांनी होड्यांच्या सहाय्याने रात्रभर खाडी परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, अथर्वचा ठावठिकाणा लागला नाही.

यानंतर पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती दिली. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी तातडीने एनडीआरएफच्या पथकाशी संपर्क साधला.

एनडीआरएफच्या दोन पथकांकडून शोध

मंगळवारी दुपारनंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन पथकांच्या माध्यमातून खाडी परिसरात अथर्वचा शोध सुरू करण्यात आला. अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास एनडीआरएफच्या जवानांना अथर्वचा मृतदेह शोधण्यात यश आले.

याच वर्षी पूर्ण केले होते इंजिनिअरिंगचे शिक्षण

अथर्वने याच वर्षी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. अभ्यासासोबतच तो खेळातही अग्रेसर होता. गणेशोत्सवासाठी कुटुंबीयांसोबत गावी आलेल्या अथर्वचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच मेढे-मांजरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *