गुहागर तालुक्यातील एका प्रौढ महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला चिपळूण येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टुनटुनकुमार रामप्रवेश महतो असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०१९ मध्ये घडलेल्या या गंभीर गुन्ह्याचा निकाल अनेक वर्षांनंतर लागला असून, न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि ३०७ अंतर्गत प्रत्येकी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
गुहागर तालुक्यातील संबंधित महिला गावाबाहेरील शेतात काम करत असताना ही घटना घडली होती. परिसरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीचा हेतू लक्षात येताच महिला तेथून गावाच्या दिशेने निघाली. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिला गाठले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर आरोपीने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिचे दोन्ही हात दोरीने बांधून गळ्याभोवती कपडा आवळण्यात आला. त्यानंतर महिला मृत झाल्याचे समजून आरोपीने तिच्यावर झाडाझुडपांच्या फांद्या टाकल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या पीडित महिलेने घडलेला प्रकार नातेवाईक, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना सांगितला. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी गावाबाहेर गॅस कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू असलेल्या परिसरात संशयित आरोपी आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला ताब्यात घेऊन पीडित महिलेसमोर आणले असता तिने त्याची ओळख पटवली. त्यानंतर या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या गंभीर गुन्ह्याचा तपास अधिकारी संदीप पाटील यांनी सखोल तपास केला. तपासाअंती आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३०७, ३४१ आणि ३४२ अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
चिपळूण सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी बाजू मांडली. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब आणि सादर करण्यात आलेले पुरावे यांच्या आधारे सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. म्हालटकर यांनी आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच कलम ३०७ अंतर्गतही जन्मठेप आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. याशिवाय कलम ३४१ आणि ३४२ अंतर्गत प्रत्येकी एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात पीडित महिलेने दाखवलेले धैर्य, पोलिसांनी केलेला तपास आणि सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले पुरावे महत्त्वपूर्ण ठरले. सरकार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांना गुहागर न्यायालयाचे कोर्ट पैरवी अधिकारी ए. एस. शिंदे यांनी सहकार्य केले.
२०१९ मध्ये घडलेल्या या गंभीर गुन्ह्यात अखेर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













