गुहागरमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, विषारी औषध सेवनाचा संशय, उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

गुहागर तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथील एका तरुणीचा मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुरुवातीला उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास होत असल्याने तिच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. मात्र पुढील तपासणीत तिने विषारी पदार्थाचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अखेर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला सुरुवातीला उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर तिच्या उलट्या आणि जुलाब थांबले. मात्र काही दिवसांनी तिला पुन्हा ताप येऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला डॉ. फणगुसकर यांच्याकडे दाखल केले. तेथे करण्यात आलेल्या रक्त तपासणीत तिला टायफॉइड झाल्याचे निदान झाले.

दरम्यान, २ जुलै २०२६ रोजी घरी असताना तिची मानसिक स्थिती बिघडल्यासारखी दिसून आली. ती असंबद्ध बोलू लागली आणि विचित्र वर्तन करू लागल्याने कुटुंबीयांनी ३ जुलै रोजी डेरवण रुग्णालयात दाखल केले. तेथे करण्यात आलेल्या रक्त तपासणीनंतर डॉक्टरांनी तिने काहीतरी विषारी औषध सेवन केले असावे, असा संशय व्यक्त केला.

डेरवण येथे एक दिवस उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी तिला मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही ५ जुलै २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजता उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद १८ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

संबंधित तरुणीने नेमके कोणते विषारी औषध सेवन केले होते, ते कशामुळे झाले आणि मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *