संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या–नागपूर महामार्गावरील आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे उघडकीस आली. दक्खन बसथांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात घडला असून, अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) हे सापुचेतळे येथून विजापूरच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत होते. आज पहाटे आंबा घाटातून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, रामा माशाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील रामा माशाळ यांना त्वरित साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत असून परिसरातील सीसीटीव्ही, तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमागे एक हळवी पार्श्वभूमीही समोर आली आहे. कुटुंबातील एका ज्येष्ठ महिलेच्या निधनानंतर सर्व नातेवाईकांनी मोठ्या वाहनाने विजापूरला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, रामा माशाळ यांनी तो सल्ला न ऐकता रात्री दीडच्या सुमारास एकट्याने दुचाकीवरून प्रवास सुरू केला. दुर्दैवाने हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.
या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृताच्या नातेवाईक बाळू मल्लारी तांबे यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना, “माझे ऐकले असते तर माझा भाचा आज जिवंत असता,” असे सांगत हळहळ व्यक्त केली.
या अपघातामुळे आंबा घाट परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













