चिपळूण तालुक्यातील खेड बावशेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेचा मुतखड्याच्या उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी समेध कांबळे (वय ३५, रा. खेड बावशेवाडी, ता. चिपळूण) यांना मुतखड्याचा त्रास होत असल्याने ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिपळूण येथील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, ९ जुलै रोजी, त्यांच्यावर मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर १० जुलै रोजी पहाटे सुमारे ५ वाजता त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तेथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच १४ जुलै २०२६ रोजी रात्री ८.११ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या मृत्यूची प्राथमिक नोंद प्रथम सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर घटनेसंदर्भातील कागदपत्रे १८ जुलै २०२६ रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर आकस्मिक मृत्यू क्रमांक ४७/२०२६ असा गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल व वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असून, चिपळूण पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













