चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणातील संशयित आरोपी विकास विजय पवार यास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, चिपळूण यांनी अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील या चर्चित प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी संतोष निकम यांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आले व तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप आरोपी विकास पवार याच्यावर करण्यात आला होता. या
तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 64(1), 64(2)(f)(m), 65(1) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 च्या कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, संशयित आरोपीच्या जामीन अर्जावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट फारुक म्हातारनाईक यांनी संशयित आरोपीच्या बाजूने सविस्तर युक्तीवाद केला. आरोपी व पीडिता हे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते व त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते, असा दावा बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडला. पीडिता ही स्वतःच्या इच्छेने संशयित आरोपीसोबत गेली होती आणि या प्रकरणाला कौटुंबिक विरोधामुळे गुन्हेगारी स्वरूप देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
याशिवाय पीडितेच्या वयाबाबतही गंभीर विसंगती असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला. फिर्यादीत नमूद करण्यात आलेले वय व प्रत्यक्ष वय यामध्ये तफावत असल्याचा दावा बचाव पक्षाने केला. आरोपी हा पाटण तालुक्यातील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने चिपळूण येथे वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसून तो गरीब कुटुंबातील तरुण असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
तसेच या प्रकरणात कोणतीही शस्त्रे, संशयास्पद वस्तू किंवा अन्य जप्ती बाकी नसल्याने पुढील कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने ठामपणे मांडला. संशयित आरोपी जामिनावर सुटल्यानंतर तो पळून जाणार नाही, साक्षीदारांवर दबाव आणणार नाही तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करेल, अशी हमी देखील न्यायालयास देण्यात आली.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, चिपळूण यांनी संशयित आरोपी विकास विजय पवार याचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने चिपळूण येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट फारुक म्हातारनाईक व त्यांचे सहकारी वैभव हळदे यांनी काम पाहिले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













