संगमेश्वर : बीएसएनएल कार्यालय फोडून चोरी

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील पैसाफंड हायस्कूलजवळ असलेल्या बीएसएनएल कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तांबे व ॲल्युमिनियमच्या प्लेटांसह सुमारे १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ ते पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान पैसाफंड हायस्कूलजवळील बीएसएनएल कार्यालयात ही चोरी झाली. या कार्यालयात कनिष्ठ दूरसंचार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उमेश सदाशिव शिरसाट (वय ४९) यांनी याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


घटनेच्या वेळी शिरसाट हे बीएसएनएल कार्यालयासमोरील महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली झोपले होते. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर बीएसएनएल कंपनीच्या टॉवरसाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या प्लेटा चोरून नेल्या.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ५ हजार २५० रुपये किमतीची १५ किलो वजनाची कॉपर प्लेट तसेच ८ हजार ४०० रुपये किमतीच्या ४८ ॲल्युमिनियम प्लेटांचा समावेश आहे. एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ (ड) आणि ३३१ (४) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.२१ वाजता दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *