दापोली : दापोली ते हिमालय! अभिजीत मयेकर यांनी एकट्याने सायकलवरून 400 हून अधिक किमीची सोलो सायकल मोहीम यशस्वी

banner 468x60

कोकणच्या मातीतून थेट हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगांपर्यंत सायकलवरून प्रवास करत दापोलीतील असोंड गावाचे सुपुत्र आणि दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य अभिजीत मयेकर यांनी हिमाचल प्रदेशातील ४०० हून अधिक किलोमीटरची सोलो सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ४ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्यांनी पठाणकोट, धरमशाला, पालमपूर, मंडी आणि मनाली परिसरातील आव्हानात्मक मार्ग सायकलवरून पार केले. विशेष म्हणजे, ही मोहीम त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय, स्वतःचे सामान सायकलवर घेऊन पूर्ण केली. त्यांच्या या साहसी कामगिरीचे दापोली परिसरातून कौतुक होत आहे.

स्वतःच्या हिमतीवर हिमालयाची वाट!

अभिजीत मयेकर यांची ही मोहीम ‘सेल्फ सपोर्टेड सोलो सायकलिंग’ प्रकारातील होती. म्हणजेच संपूर्ण प्रवासात आवश्यक सामान स्वतःच्या सायकलवर घेऊन त्यांनी एकट्याने हा प्रवास केला. या मोहिमेसाठी त्यांनी स्वतःची सायकल दापोलीहून खेडमार्गे मुंबईला नेली आणि तेथून रेल्वेने पठाणकोट गाठले. पठाणकोट येथून त्यांच्या हिमाचल प्रदेशातील सायकल मोहिमेला सुरुवात झाली.

या प्रवासात त्यांनी ‘क्लीन भारत, ग्रीन भारत’, ‘राईड क्लीन, ब्रीद क्लीन’ अर्थात स्वच्छ भारत, हरित भारत आणि स्वच्छतेचा संदेश देत पर्यावरणपूरक प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले. कोकणच्या किनारपट्टीवरून हिमालयातील खडतर घाटांपर्यंतचा हा प्रवास शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक जिद्द, संयम आणि चिकाटीची कसोटी पाहणारा ठरला.

निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू आणि हिमालयाचा थरार

या मोहिमेदरम्यान अभिजीत यांनी हिमाचल प्रदेशातील अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट दिली. पठाणकोटपासून पुढे जाताना ऐतिहासिक नूरपूर किल्ला, भाली गाव, शहापूर आणि मस्तपूर परिसरातील स्थापत्यकला, सुंदर कोरीवकाम असलेली मंदिरे तसेच जुन्या महालांचे अवशेष त्यांनी जवळून अनुभवले.

धरमशाला येथील प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव त्यांच्यासाठी विशेष ठरला. गोपाळपूर येथील चहाचे मळे आणि पालमपूरमधून दिसणाऱ्या धौलाधार पर्वतरांगांतील बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालणारे होते. बैजनाथ येथील शिवमंदिर आणि बीर-बिलिंग येथील पॅराग्लायडिंग लँडिंग पॉइंटवर आकाशातून झेपावणाऱ्या रंगीबेरंगी पॅराग्लायडर्सना उतरताना पाहण्याचाही आनंद त्यांनी घेतला.

जोगिंदर नगर येथील ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आणि टॉय ट्रेन, ब्रिटिशकालीन शानन पॉवर हाऊस तसेच जोहार खोऱ्यातील झटिंगरी परिसरातील खडतर चढण हे या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरले. येथून दिसणाऱ्या पर्वतरांगा, डोंगरउतारांवरील छोटी खेडी आणि जुन्या लाकडी हिमालयीन घरांनी त्यांना विशेष आकर्षित केले.

बियास नदीच्या साथीने मनालीपर्यंत सायकल प्रवास

मंडी शहरातून पुढे जाताना बियास नदीच्या सोबतीने असलेला संथ चढणीचा मार्ग, पंडोह धरण, हनोगी माता मंदिर आणि पांगन गाव या ठिकाणांचा अनुभव अभिजीत यांनी घेतला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सफरचंद, प्लम, नाशपाती, जरदाळू आणि डाळिंबाच्या बागा पाहत त्यांनी पतलीकुहलमार्गे मनाली गाठले.

या संपूर्ण प्रवासात निसर्गाचे बदलते रंग, उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या आणि हिमालयातील विलोभनीय सूर्यास्त यांनी त्यांच्या मोहिमेला वेगळीच अनुभूती दिली. विशेषतः ३६० अंशांत पसरलेल्या धौलाधार पर्वतरांगांचे दृश्य आणि हिमालयातील सूर्यास्ताचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

थंडी, वारा, पाऊस आणि खडतर चढणींची परीक्षा

हिमालयातील सायकल मोहीम केवळ निसर्गसौंदर्य अनुभवण्यापुरती मर्यादित नव्हती. या प्रवासात थंडी, वारा, पाऊस, रस्त्यावरील चढउतार आणि उंचीतील मोठे बदल यांचा सामना करावा लागला. हजारो मीटरची उंची गाठताना शारीरिक क्षमतेची कसोटी लागली. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभिजीत यांनी ही आव्हाने पार केली.

या प्रवासात हिमाचल प्रदेशातील स्थानिक नागरिकांचा प्रेमळ पाहुणचार आणि आपुलकीने केलेली मदतही त्यांच्या स्मरणात राहिली. थकवणारा असला तरी मनाला प्रचंड समाधान देणारा हा प्रवास असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकणच्या सायकलस्वाराची कौतुकास्पद कामगिरी

हिमालयातील दुर्गम मार्गांवर ४०० हून अधिक किलोमीटरचा प्रवास एकट्याने पूर्ण करत अभिजीत मयेकर यांनी साहस, आत्मविश्वास आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव यांचा सुंदर संगम साधला आहे. कोकणातून हिमालयापर्यंत पोहोचून स्वतःच्या हिमतीवर ही मोहीम पूर्ण करणे, ही दापोलीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

“हिमालयाच्या वाटा खूप काही शिकवून जातात,” या भावनेतून त्यांनी या प्रवासातील अनुभव जपले आहेत. सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे स्वप्नवत वाटणारी ही सोलो सायकल मोहीम प्रत्यक्षात पूर्ण करता आली, अशी भावना अभिजीत यांनी व्यक्त केली. त्यांच्या या साहसी कामगिरीबद्दल दापोलीसह कोकण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *