रत्नागिरीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरातील नाचणे-एकता नगर परिसरातील एका ३७ वर्षीय तरुणाने घरातील खोलीत फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. राहूल नंदकिशोर मुळे (वय ३७, रा. एकता वसाहत, शांतीनगर-नाचणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) रात्री उघडकीस आली.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल याला दीर्घकाळापासून मायग्रेनचा त्रास होता. या आजारामुळे तो मानसिक नैराश्यात राहत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी त्याचे वडील नंदकिशोर मुळे आणि आई त्याला घेऊन एमआरआय ब्रेन स्क्रिनिंग टेस्टसंदर्भात चौकशी करण्यासाठी चिरायु हॉस्पिटल येथे गेले होते. त्यानंतर ते आठवडा बाजारातून घरी परतले.

घरी आल्यानंतर मुख्य दरवाजाला कुलूप असल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्यात आला. मात्र राहूल घरात दिसून आला नाही. परिसरात शोध घेतल्यानंतर त्याची आई वरच्या खोलीकडे गेली असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने मागील बाजूने दरवाजा उघडून पाहिले असता राहूलने फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *