रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह शनिवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून सहा तालुक्यांतील साडेतीनशेहून अधिक घरे, गोठे आणि शासकीय इमारतींचे मिळून सुमारे ५० लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. तर वेगवान वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून वीजवाहिन्या तुटल्याने महावितरणला तब्बल ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका रत्नागिरीच्या प्रसिद्ध हापूस आंबा पिकालाही बसला असून लाखो रुपयांचा आंबा गळून पडला आहे.
शनिवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन जिल्ह्यात वेगवान वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाचा सर्वाधिक फटका घरांना आणि महावितरणच्या वीज यंत्रणेला बसला. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या सात तालुक्यांमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार, उच्चदाब वाहिनीचे १०८ आणि लघुदाब वाहिनीचे २३५ असे एकूण ३४३ वीज खांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबताच महावितरणने तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेतली असून २० ठेकेदार आणि १५० कामगार युद्धपातळीवर काम करत आहेत.
या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील शेकडो घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या छपरांवरील पत्रे उडून गेली, तर काही ठिकाणी झाडे घरांवर कोसळली. रत्नागिरी शहरालगतच्या मिरकरवाडा बंदर परिसरात लोखंडी पत्रे पाला-पाचोळ्यासारखी हवेत उडताना दिसत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तालुकानिहाय नुकसानीचा आढावा घेतल्यास राजापूर तालुक्यात सर्वाधिक ७३ घरे व गोठ्यांचे १७ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील २४ घरांसह एक अंगणवाडी व दोन शासकीय इमारतींचे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यात ११७ घरांचे सुमारे ५ लाखांचे नुकसान, तर संगमेश्वर तालुक्यातील ११ घरांचे ५ लाख २८ हजारांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात ३८ घरांचे २ लाख ३४ हजारांचे अंशतः नुकसान झाले असून दापोली आणि लांजा तालुक्यातही नुकसान झाले असून पंचनामे सुरू आहेत.
वादळी पावसाचा मोठा फटका रत्नागिरीच्या हापूस आंबा बागांना बसला आहे. वेगवान वाऱ्यामुळे लाखो रुपयांचा आंबा झाडांवरून गळून पडल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले असले, तरी दुर्गम ग्रामीण भागातील काम अद्याप सुरू आहे. महावितरणची पथके अहोरात्र कार्यरत असून नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













