रत्नागिरी : विनापरवाना फ्लेक्स, बॅनरवर गुन्हे दाखल होणार, ‘क्यूआर’ कोड नसलेले फ्लेक्सही कारवाईच्या रडारवर, संबंधित व्यक्तींचीही चौकशी

banner 468x60

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना तसेच नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मुद्रक व प्रकाशकाचे नाव-पत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना क्रमांक, परवानगीचे ठिकाण आणि कालावधी यांसह आवश्यक माहिती असलेला ‘क्यूआर’ कोड नसलेला फ्लेक्स आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, अशा विनापरवाना फ्लेक्सवर फोटो किंवा नाव झळकणाऱ्या व्यक्तींचीही प्रथमदर्शनी सहभागाच्या आधारे चौकशी करण्यात येणार आहे. सहभाग आढळल्यास संबंधित व्यक्तीलाही सहआरोपी करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अ‍ॅक्ट, १८६७’मधील कलम ३, मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मधील निर्देश तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.

फ्लेक्सवर ‘क्यूआर’ कोड बंधनकारक

सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टरवर मुद्रक, प्रकाशक व अर्जदाराचे नाव-पत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना क्रमांक, परवानगीचे ठिकाण आणि परवानगीचा कालावधी यांसह आवश्यक माहिती असलेला ‘क्यूआर’ कोड ठळकपणे देणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

फ्लेक्सवरील चेहऱ्यांवरही तपासाची नजर

विनापरवाना फ्लेक्सवरील फोटो आणि नावे प्राथमिक तपासातील महत्त्वाचे पुरावे मानले जाणार आहेत. संबंधित फ्लेक्स कोणी तयार केला, कोणी छापला, कोणाच्या सांगण्यावरून तो लावण्यात आला आणि त्यासाठी संबंधित व्यक्तीची संमती किंवा सहभाग होता का, याचा तपास केला जाणार आहे.

तपासात संबंधित व्यक्तीचा सहभाग आढळल्यास तिच्यावरही गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याने विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांसह त्यावर झळकणाऱ्या व्यक्तींच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *