रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेल्या एसटी बससमोर दुचाकी आडवी लावून बसचा रस्ता अडवणे, चालकाला शिवीगाळ करणे आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असलेल्या एसटी चालकाला धमकावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ ब्रम्हदेव माळी (वय ३५, मूळ रा. कामते खुर्द, ता. मोहोळ, जि. सोलापूर; सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ते रत्नागिरी ते खेडशी नाका या नियोजित मार्गावर एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ४४६२ घेऊन जात होते.
रात्री पावणेनऊच्या सुमारास माळनाका येथील हेळेकर मिठाई दुकानासमोरील अधिकृत बसथांब्यावर प्रवासी उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी डाव्या बाजूचा इंडिकेटर देत बस थांब्यावर घेतली आणि प्रवाशांना बसमध्ये घेतले. प्रवाशांना घेऊन बस पुढे मार्गस्थ होत असतानाच एमएच ०८ बीजे ८११८ क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाने एसटी बससमोर दुचाकी आडवी लावून बसचा रस्ता अडवला.
यानंतर दुचाकीस्वार खाली उतरला आणि ‘येथे गाडी का थांबवलीस?’ असा जाब विचारत एसटी चालक नागनाथ माळी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. संबंधित चालक गणवेशात असून कर्तव्यावर असल्याची माहिती असतानाही संशयिताने बसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चालकाला मारण्यासाठी अंगावर धावून जात बस येथून पुढे न्यायची नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे कर्तव्य बजावत असलेल्या एसटी चालकाच्या कामात अडथळा निर्माण झाला. घटनेनंतर नागनाथ माळी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित दुचाकीच्या अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२६(२), ३५२, ३५१(२) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे संबंधित चालकाची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.
कर्तव्यावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्या कामात अडथळा आणण्याच्या या घटनेमुळे माळनाका परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













