रत्नागिरी फणसवळे गावातील जंगलमय परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या टोळीविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झालेल्या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
फणसवळे गावाच्या जंगलमय परिसरात 20 ऑगस्ट 2026 रोजी घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते.
3 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 12.30 वाजता पोलीस पथक करबुडे फाटा ते फणसवळे मार्गावर पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुन्ह्याच्या घटनास्थळाजवळील जंगलात झाडीझुडपांच्या आड एक संशयास्पद चारचाकी वाहन उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांचे पथक वाहनाजवळ पोहोचताच वाहनातील आरोपींनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर शासकीय वाहन उभे असल्याने त्यांना त्या दिशेने जाता आले नाही. त्यानंतर आरोपींनी वाहन जंगलाच्या दिशेने वळवले.
यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी धाडसाने झडप घालत झटापट करून मोहसीन बाबू कुरेशी (30, रा. मिरा रोड, मुंबई) याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अन्य आरोपी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून जंगल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. सकाळी सुमारे 7.30 वाजता पोलिसांनी शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख (48, रा. जनता सेवक सोसायटी, माहीम पश्चिम, मुंबई) याला जंगलातून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता, जंगलात पसार झालेल्या अन्य दोन आरोपींची नावे अस्लेम (रा. बांद्रा-कुर्ला, मुंबई) आणि देवा (रा. विरार) असल्याची माहिती मिळाली. या दोघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 132, 336 (3), 325, 3 (5) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 मधील कलम 5, 5 (अ), 5 (ब) आणि 9 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली तसेच पोलीस अंमलदार संकेत महाडीक, सागर साळवी, स्वप्निल तेरवणकर आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













