कोकणवासियांचे स्वप्न अखेर साकार! CSMT–सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस आजपासून सेवेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; मुंबई ते सावंतवाडी प्रवास होणार अधिक सुलभ

banner 468x60

कोकणवासीय आणि चाकरमान्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यान बहुप्रतीक्षित नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित रेल्वे प्रवासाची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे प्रत्यक्ष उपस्थित होते.

तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियमित रेल्वे सेवा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत होत असून, चाकरमान्यांसाठीही ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

दररोज धावणार एक्स्प्रेस

नवीन नियमित सेवा गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि 15088 सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या क्रमांकांनी दररोज धावणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

या नियमित रेल्वे सेवेमुळे मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीपर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, कोकणातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होण्यास मदत होणार आहे.

कोकणवासीयांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर रेल्वेची जोड मिळाल्याने आजचा दिवस कोकणच्या रेल्वे प्रवासासाठी ऐतिहासिक ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *