चिपळूण : गणेशोत्सवापूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल सुरू होण्याची शक्यता

banner 468x60

चिपळूण शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टीने बौद्धवाडी येथील जोडरस्त्याच्या माती भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग विभागाने ठेवले आहे. त्यामुळे अठरा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या उड्डाणपुलावरून चाकरमान्यांचा प्रवास सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंता वृषाली पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी वाहनातून प्रवास करत उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. बौद्धवाडी येथील जोडरस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम सुरू आहे.

सुमारे २५ डंपरच्या साहाय्याने मातीचा भराव करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या डांबरीकरण न करता आवश्यक भराव आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. सध्या सर्व्हिस रोडवर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू झाल्यास चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

उड्डाणपूल सुरू करण्याची घाई असली तरी प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बौद्धवाडी येथील मातीच्या भरावाची स्थिरता, साईड स्लोपची सुरक्षितता, मातीची आवश्यक घनता तसेच कम्पॅक्शन चाचण्यांसह सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक खुली केली जाणार आहे.

“चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बौद्धवाडीतील भरावाचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. भराव खचू नये किंवा वाहनांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक खबरदारी घेऊनच वाहतूक सुरू केली जाईल.”

— वृषाली पाटील, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पूल लवकर सुरू व्हावा; मात्र सुरक्षिततेच्या सर्व निकषांची पूर्तता करूनच तो सुरू करण्यात यावा, अशा सूचना महामार्ग विभागाला देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सेवारस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

“अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिपळूणचा उड्डाणपूल खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पूल लवकर सुरू व्हावा; मात्र तो सुरक्षिततेच्या सर्व निकषांची पूर्तता करूनच सुरू व्हावा, अशा सूचना महामार्ग विभागाला दिल्या आहेत. गणेशोत्सवात सेवारस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी एक मार्गिका सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.”

— आकाश लिगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *