रत्नागिरी : राखणेच्या मानाच्या ताटावरून वादातून ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू; ओझरवाडी परिसरात खळबळ

banner 468x60

रत्नागिरी शहरातील ओझरवाडी परिसरात घडलेल्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत कृष्णा फके (वय ७३) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. १५ मे रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी ओझरवाडी येथील शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून चौघांनी मिळून यशवंत फके यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर, कमरेवर गंभीर दुखापत झाली तसेच उजव्या खुब्याला फ्रॅक्चर झाले.
मारहाणीनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते आणि ते ओझरवाडी येथे विश्रांती घेत होते.


मात्र, १५ मे रोजी पहाटे त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्यांना तातडीने रत्नागिरीतील अपरांत रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.


मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालय परिसरात जमा झाले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि रामतीर्थ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


यशवंत फके हे काँग्रेसचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी चिपळूण व रत्नागिरी परिसरात अनेक वर्षे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली होती. ते नगर परिषद निवडणुकांमध्येही सहभागी झाले होते.
या घटनेमुळे ओझरवाडी आणि रत्नागिरी शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *