रत्नागिरी : गांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई, 2.100 किलो गांजासह एकाला अटक

banner 468x60

रत्नागिरी शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. काजरघाटी धार परिसरात गस्तीदरम्यान संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजासह वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

इम्रान मोहम्मद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी रत्नागिरी शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक काजरघाटी धार परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी एमएच-०८-बीबी-६७३६ क्रमांकाच्या शाईन दुचाकीवरून जाणारी व्यक्ती पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली. त्यानंतर अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ गांजा तसेच त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा कुठून आणण्यात आला होता आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, यासह पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात, पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिस कर्मचारी दिपू साळवी, शांताराम झोरे, अमित पालवे, दिनेश आखाडे आणि भालचंद्र मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केल्याने शहर परिसरातील गांजा विक्रीच्या नेटवर्कवर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *