मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.५५ वाजता घडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांची वर्दळ असताना झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी एक दुचाकी आणि विरुद्ध दिशेने येणारी दुसरी दुचाकी कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी तीव्र होती की दोन्ही दुचाकींवरील तिघांना दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच ड्युटीवर जात असलेले होमगार्ड जवान नवनाथ घोलप यांनी घटनास्थळी थांबून जखमींना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था झाली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांची अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेली विनामूल्य रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने तिन्ही जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले.
या अपघातात लक्ष्मण राम धोत्रे (वय ३२, मूळ रा. लातूर, सध्या कळंबणी), चंद्रकांत दत्ताराम आग्रे (वय ३१, रा. वीरबंदर, चिपळूण) आणि किरण कृष्णा कलके (वय २९, रा. वीरबंदर, चिपळूण) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













