रत्नागिरी : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातील सर्वोत्तम पाच अधिकाऱ्यांमध्ये, ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’साठी निवडनितीन बगाटे यांचा राष्ट्रीय सन्मान

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेसाठी देशातील सर्वोत्तम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेल्या ‘रेड्स’ (RAIDS) या अत्याधुनिक अ‍ॅपच्या नाविन्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

या अ‍ॅपचे नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत सादरीकरण करण्यात आले. अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासोबतच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे या अ‍ॅपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

‘रेड्स’च्या माध्यमातून अज्ञात व बेवारस मृतदेहांची माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाते. उपलब्ध छायाचित्रे आणि इतर माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने चेहरा ओळखणे कठीण असतानाही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करण्यास या तंत्रज्ञानाची मोठी मदत होते.

बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठीही या अ‍ॅपचा प्रभावी वापर केला जात आहे. एका व्यक्तीच्या चेहऱ्याची तांत्रिक पद्धतीने १०८ विविध रूपे तयार करून त्याआधारे शोध घेण्यात येतो.

या अ‍ॅपवर आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस आणि कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांच्या AI आधारित डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून, त्यातील १४ प्रकरणांमध्ये मृतदेहांची यशस्वी ओळख पटविण्यात आली आहे.

जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी सात प्रकरणांची उकल करण्यातही या अ‍ॅपला यश आले आहे. याशिवाय अ‍ॅपमध्ये ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘रेड्स’ अ‍ॅपच्या माध्यमातून केले जात आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्याचे हे उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे.

याच नाविन्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’साठी देशातील सर्वोत्तम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *