रत्नागिरी : ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली महिलेची 53 हजारांची फसवणूक; रत्नागिरीत सायबर गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरात ऑनलाईन क्लासेसच्या जाहिरातीला भुलून एका महिलेची तब्बल ५३ हजार ५६३ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे विकास जाडान नामक व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये संबंधित महिला आपल्या घरी असताना युट्यूबवर ‘प्लॅनेट स्पार्क क्लासेस’ या नावाने ऑनलाईन शिक्षणाची जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीतील माहितीच्या आधारे विकास जाडान नावाच्या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधून दोन वर्षांच्या ऑनलाईन कोर्सची माहिती दिली. कोर्स अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत त्यांच्याकडून विविध टप्प्यांत क्रेडिट कार्डद्वारे शुल्क भरून घेण्यात आले.

महिलेने विश्वास ठेवून वेळोवेळी एकूण ५३ हजार ५६३ रुपये भरले. मात्र, पैसे भरूनही संबंधित कोर्स सुरू झाला नाही. तसेच कोर्ससंदर्भात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत. वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

यानंतर पीडित महिलेने सायबर तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर ८ मे २०२६ रोजी अधिकृतरीत्या गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ऑनलाईन व्यवहार करताना तसेच सोशल मीडिया किंवा युट्यूबवरील जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित संस्था व सेवांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *