मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराला विरोध करणाऱ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शहरातील कुवारबाव येथील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरात घडली आहे. कुत्र्याला दगड मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला समज दिल्याचा राग मनात धरून आरोपीने थेट सुरीने हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रतन शिंदे (वय २३, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. साळवी स्टॉप) हे १५ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांच्या घरासमोर बसले होते. त्याचवेळी परिसरात फिरणाऱ्या एका कुत्र्याला विशाल विलास शिंदे (वय २५, रा. साळवी स्टॉप) याने हाकलून लावले. त्यामुळे कुत्रा भुंकू लागला.
कुत्र्याच्या भुंकण्याचा राग आल्याने विशाल शिंदे याने त्याला दगड मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार पाहून अर्जुन शिंदे यांनी त्याला मुक्या प्राण्याला मारू नये, अशी समज दिली. तसेच प्राण्यांवर अत्याचार करू नकोस, असे सांगत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने अर्जुन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळातच आरोपी आपल्या घरात गेला आणि तेथून धारदार सुरी घेऊन परत आला. संतापाच्या भरात त्याने अर्जुन यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार केला. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी झाले. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.
घटनेनंतर जखमी अर्जुन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अर्जुन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावरच जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













