संगमेश्वर तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नियाज पाटणकर आणि जाकीर पाटणकर यांचे कौलारू घर पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यही जळून नष्ट झाले असून पाटणकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, घटना घडली त्यावेळी घर बंद असल्याने आणि घरात कोणीही वास्तव्यास नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, नायरी मोहल्ला येथील पाटणकर यांचे घर मध्यरात्री अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुरुवातीला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला वेढा घातला. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच देवरुख येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले.
मात्र, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले होते. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाहता पाहता संपूर्ण कौलारू घर आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे पाटणकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच फणसवणे मंडल अधिकारी कदम, तलाठी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून महसूल विभागाकडून पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पंचनामा पूर्ण झाल्यानंतर आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पाटणकर कुटुंबाचा संपूर्ण संसार आगीत उद्ध्वस्त झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*









