रत्नागिरी : मिरजोळेत बंद घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास, मंगळसूत्रासह दागिने चोरी

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बंद घरावर लक्ष ठेवून अज्ञात चोरट्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घरफोडीत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ८ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

banner 728x90

फिर्यादी ओंकार रामचंद्र पाडावे (वय ३२) हे नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. १६ मे रोजी रात्री ८ वाजल्यानंतर त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडले. दरवाजा उघडल्यानंतर चोरट्याने थेट घरातील बेडरूम गाठली. बेडरूमचा दरवाजाही अर्धवट मोडून आत प्रवेश करण्यात आला.

यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटाचे लॉकर फोडले आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीची माहिती मिळाल्यानंतर घरमालकांनी तत्काळ घरात पाहणी केली असता कपाट उघडलेले आणि घरातील सामान विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आले.

चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ५० हजार रुपयांची रोख रक्कम, २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सुमारे ४ तोळे ८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३४ हजार ३६५ रुपये किमतीची सोन्याची चेन, २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, २० हजार आणि १५ हजार रुपये किमतीचे दोन जोड कानातले, १० हजार ८२७ रुपये किमतीची सोन्याची बेबी रिंग, १० हजार रुपये किमतीची कानवेली तसेच ३ हजार रुपये किमतीची सोन्याची नथ यांचा समावेश आहे.

या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादी ओंकार पाडावे यांनी १७ मे रोजी रात्री ८:४४ वाजता अधिकृत फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५(क), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा क्रमांक १५३/२०२६ दाखल केला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या टोळीचा यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

या घरफोडीनंतर मिरजोळे आणि आसपासच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शहरालगतच्या उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *