रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत विक्रीसाठी आणलेला १ लाख २१ हजार रुपये किमतीचा ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मूळचे नेपाळचे असलेल्या दोन संशयितांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार अमित कदम हे सहकाऱ्यांसह १८ सप्टेंबर रोजी रात्री शासकीय वाहनातून रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. माळनाका, साळवी स्टॉप, नाचणे रोड आणि एसटी स्टँड परिसरात गस्त घातल्यानंतर पोलीस पथक आठवडा बाजार परिसरात पोहोचले.
दरम्यान, रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास आठवडा बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी कारवाई करत शिव कुमार चौधरी उर्फ शिव बहादूर सोनार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत १ लाख २१ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पदार्थाची विक्री करण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये किमतीच्या २४२ लहान पुड्या तयार करण्यात आल्या होत्या.
याशिवाय अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली प्लॅस्टिकची पिशवी, पुड्या बांधण्यासाठी वापरलेले कागदाचे २४२ तुकडे आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी शिव कुमार चौधरी उर्फ शिव बहादूर सोनार याच्यासह अन्य एका नेपाळी संशयिताविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी पहाटे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













