गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या जिल्हावासीयांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. वाढीव रिक्षा भाडे, सीएनजीचा तुटवडा आणि घाट मार्गावरील वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करत चोख नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
प्रवाशांची फसवणूक आणि मनमानी भाडेवसुली रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत दरपत्रकाचे फलक लावावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच रिक्षाचालकांकडून वाढीव भाडे आकारले जाणार नाही, याची प्रभावीपणे तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत असल्याने घाट मार्गांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवावी, असेही जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले.
सीएनजीच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून गणेशोत्सव काळात नागरिकांना इंधनासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याने सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळीही आपले मोबाईल फोन बंद ठेवू नयेत आणि सतत संपर्कात राहावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या.
गणेशभक्त, जिल्हावासीय आणि स्थानिक नागरिकांचा गणेशोत्सवाचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि त्रासमुक्त व्हावा, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













