दापोली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, तालुक्यातील तब्बल ५६ ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांच्या माध्यमातून चालणार आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये संबंधित ग्रामपंचायतींच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपली होती. त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने पुन्हा प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार या प्रशासकीय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींमधील नियमित लोकप्रतिनिधींचा कारभार नसताना गावातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज, विकासकामांशी संबंधित प्रक्रिया, नागरिकांच्या विविध मागण्या आणि आवश्यक ग्रामपंचायतस्तरीय कामे नियुक्त प्रशासकांच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहेत.
५६ ग्रामपंचायतींचा समावेश
प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये साखळोली, वाकवली, शिवाजीनगर-दापोली, आडे-खुर्द, आंजर्ले, सुकोंडी, कोळथरे, अडखळ, पालगड, जामगे, पिसई, मुगीज, विसापूर, आवाशी, शिरखल, मुर्डी, पांगारी तर्फे हवेली, पन्हाळेकाजी, उन्हवरे, शिरवणे, दाभिळ, चंद्रनगर, म्हाळुंगे, टांगर गणपतीपुळे, शिवाजीनगर सा. वडवली, शिरसोली, नवशी, बुरोंडी, ओणणंवसे, भोपण, गुढे-उटंबरघर-पणदेरी, ताडील, आसूद, पंचनदी, दाभोळ, वनोशी तर्फे पंचनदी, चिखलगाव, लाडघर, पाडले, गिम्हवणे, केळशी, हर्णे, मुरुड, आडे, आंबवली बु., कर्दे, असोंड-शिवनारी, पोफळवणे, टेटवली आणि मौजे दापोली आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दैनंदिन कारभार प्रशासकांच्या हाती
ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर गावपातळीवरील विकासकामे आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहणे आवश्यक असल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज आता नियुक्त प्रशासकांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.
दरम्यान, मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक नियुक्त झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावातील प्रश्न मांडले जाण्याऐवजी सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार सुरू राहणार असल्याने आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













