रत्नागिरी : मासेमारी बोटीवर काम करताना ड्रिल पाना छातीत घुसून वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी येथे मासेमारी बोटीवर सुतारकाम करत असताना बोटीला छिद्र पाडण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रिल पाना अचानक उडून छातीला लागल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २८) घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत यशवंत गोळपकर (वय ६०, रा. कासारवेली, रत्नागिरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गोळपकर हे मासेमारी बोटीवर सुतारकाम करत होते. यावेळी बोटीला होल पाडण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रिल पाना अचानक तुटून किंवा उडून त्यांच्या छातीवर जोरात आदळला. या गंभीर दुखापतीमुळे ते जागीच बेशुद्ध झाले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. अपघाती मृत्यू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षेची साधने आणि खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा जाणीव या दुर्दैवी घटनेतून झाली आहे. चंद्रकांत गोळपकर यांच्या निधनामुळे कासारवेली परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *