रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली (मराठवाडी) येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर जुन्या रागातून काचेच्या बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत रमेश राऊत (वय ४८) हे गंभीर जखमी झाले असून, चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसन्न रमेश राऊत यांचे गावात चिकन विक्रीचे दुकान आहे. दिनांक १६ मे २०२६ रोजी त्यांचा भाऊ प्रशांत राऊत दुकानात काम करत असताना, दुकानासमोरील ‘समर्थ बिअर शॉपी’मध्ये काही इसमांचे जोरदार भांडण सुरू होते. बिअर शॉपीचे मालक राजेश सावंत आणि चार अनोळखी इसमांमध्ये वाद सुरू होता.
यावेळी प्रशांत राऊत यांनी मध्यस्थी करत सामोपचाराने वाद मिटवला. मात्र, याचाच राग मनात धरून रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास प्रशांत राऊत हे ‘राधिका चायनिज सेंटर’वरून पार्सल घेऊन मोटारसायकलवर बसत असताना, त्या चार इसमांपैकी एकाने मागून येत त्यांच्या डोक्यावर आणि हातावर काचेची बिअरची बाटली फोडली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, इतर आरोपींनीही प्रशांत यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील अविनाथ सावंत यांनी पुढे येत जखमी प्रशांत यांची सुटका केली. नागरिक जमा होत असल्याचे पाहून चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
रक्तबंबाळ अवस्थेतील प्रशांत राऊत यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालय, पाली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रसन्न राऊत यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माध्यमांच्या आधारे रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













