रत्नागिरीत डेंग्यूचा विळखा, जिल्ह्यात 92 रुग्ण, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 52

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. २०२६ मध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत जिल्ह्यात ९२ डेंग्यू बाधित रुग्णांची नोंद झाली असून, यातील तब्बल ५२ रुग्ण एकट्या रत्नागिरी तालुक्यातील आहेत. शहरातील अर्धवट आणि सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी, तसेच भंगार व टायर विक्रेत्यांच्या परिसरातील अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाने रत्नागिरी नगरपालिकेला पत्र देऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यासह दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा हिवताप कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षात ऑक्टोबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील ५५६ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ९२ जणांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषतः ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. ऑगस्टमध्ये १८, सप्टेंबरमध्ये ३९, तर ऑक्टोबरमध्ये २३ रुग्ण आढळले. नोव्हेंबरच्या पहिल्या पाच दिवसांत १५ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली; मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ४२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा ऑक्टोबरअखेरच ९२ रुग्ण आढळल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ५२ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील असल्याने शहर आणि परिसरातील डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

रत्नागिरी शहरातील काही भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तांबटआळी परिसरातील सॅक्रेड हार्ट शाळेच्या आवारात सहा डेंग्यू रुग्ण आढळल्याची बाब समोर आली. परिसराची पाहणी केली असता मस्कर दवाखान्याशेजारील एक जुने बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याचे आणि तेथे पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिस लाईन परिसरातही मोठ्या बांधकामांवर काम करणारे मजूर वारंवार डेंग्यू बाधित आढळत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. मजुरांच्या निवासाच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट्समध्ये साचणारे पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात वारंवार सूचना देऊनही काही बांधकाम ठेकेदारांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांना तातडीने नोटीस बजावावी, बांधकामाच्या ठिकाणी धूरफवारणी आणि अळीनाशक फवारणी करावी, तसेच डासांच्या अळ्यांची घनता धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, रत्नागिरीतील काही राजकीय लोकप्रतिनिधींनाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव हा केवळ विशिष्ट भागापुरता मर्यादित नसून शहरातील विविध भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

टायर आणि भंगार विक्रेत्यांनाही सक्त सूचना

डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांची उत्पत्ती स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे टायर आणि भंगार साहित्याच्या ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व भंगार आणि टायर विक्रेत्यांना याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

उघड्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये, प्लास्टिक साहित्यामध्ये तसेच भंगार वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये, पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडी करावीत आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांसह बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि व्यावसायिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. केवळ रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या उपाययोजनांवरून स्पष्ट होत आहे.