रत्नागिरी : अमली पदार्थ विक्रीला पोलिसांचा दणका, दोन कारवायांत 8 ग्रॅम हेरॉईनसदृश पदार्थ जप्त

banner 468x60

रत्नागिरी शहरात अमली पदार्थांची बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने हेरॉईनसदृश पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन संशयित आरोपींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सलग दोन कारवाया केल्या. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ८ ग्रॅम हेरॉईनसदृश अमली पदार्थ आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिली कारवाई १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूस करण्यात आली. आंब्याच्या झाडाखाली संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या अलमहीब असगर सोलकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) याची पोलिसांनी तपासणी केली. त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीसह ४.५ ग्रॅम वजनाचा हेरॉईनसदृश पदार्थ आढळून आला. निव्वळ अमली पदार्थाचे वजन २.५ ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा पदार्थ विक्रीसाठी ५२ पुड्यांमध्ये तयार करण्यात आला होता. जप्त अमली पदार्थाची किंमत २६ हजार रुपये, तर त्याच्याकडील ओपो कंपनीचा मोबाईल सुमारे २० हजार रुपये किमतीचा आहे. या कारवाईत एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(अ), २१(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दुसरी कारवाई अवघ्या काही तासांच्या अंतराने १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.११ वाजता निवखोल परिसरात केली. लाला कॉम्प्लेक्ससमोरील इलेक्ट्रिक पोलजवळ संशयितरीत्या आढळलेल्या तनवीर युसूफ मुल्ला (५२, रा. राजीवडा, बडये मशीदजवळ, रत्नागिरी) याची झडती घेतली असता त्याच्याकडे हेरॉईनसदृश पदार्थ आढळून आला.

प्लास्टिक पिशवीसह या पदार्थाचे वजन ३.५ ग्रॅम असून, त्याच्या ३२ पुड्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या पदार्थाची किंमत १६ हजार रुपये, तर त्याच्याकडील ओपो कंपनीच्या मोबाईलची किंमत १९ हजार रुपये असल्याने एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विनोद विश्राम कदम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५२/२०२६ दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २१(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला पदार्थ हेरॉईनसदृश अमली पदार्थ असल्याचे प्राथमिक स्वरूपात नमूद करण्यात आले आहे. या पदार्थाचे नेमके स्वरूप व त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष नमुना परीक्षणानंतर स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी शहरात अमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या सलग कारवायांमुळे अमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *