राजापूर : आडिवरेत शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक, परिसरात तीव्र संताप

banner 468x60

राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या गंभीर गुन्ह्यात स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाचा समावेश असल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. नाटे (सागरी) पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, रामनाथ नारायण वाकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो आडिवरे परिसरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या आणि समाजात आदर्श मानल्या जाणाऱ्या शिक्षकानेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

पीडित महिला २० आणि २१ एप्रिल रोजी आडिवरे-रुंडे येथील काजू बागेत कुंपणासाठी खड्डे खोदण्याचे काम करत होती. या दरम्यान आरोपीने संधी साधत महिलेला एकटे गाठले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला मारहाण करत जमिनीवर पाडले आणि “घटनेबाबत कुणाला सांगितले, तर जीव घेईन,” अशी धमकी दिली.

या प्रसंगामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने काही काळ गप्प राहणे पसंत केले. मात्र, नंतर तिने धैर्य एकवटत नाटे (सागरी) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून अखेर आरोपी शिक्षकाला त्याच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे आडिवरेसह संपूर्ण राजापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नाटे (सागरी) पोलीस करत असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *