रायगड : आधी प्रेयसीला ठार केलं मग स्वत:लाही संपवलं, धक्कादायक घटनेनं रोहा हादरलं 

banner 468x60

रायगड जिल्ह्यातील रोहा (Raigad Roha) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. निडी गावात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे, त्यानंतर गळफास घेऊन स्वतःला देखील संपवल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निडी गावातील रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते.

banner 728x90

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शाब्दिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले.

या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे वास्तव्यास आहेत. घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याने घराची चावी त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *