गुहागर : कार-दुचाकीच्या अपघातात पेंटरचा मृत्यू

banner 468x60

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ४७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत व्यक्ती स्थानिक पातळीवर प्रसिद्ध पेंटर म्हणून परिचित होते.

banner 728x90

संजय वसंत कानसरे (वय ४७, रा. वरचापाट, सांगळेवाडी, गुहागर यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कानसरे हे आपल्या दुचाकीवरून मोडकाघर येथून गुहागरच्या दिशेने येत होते. त्याचवेळी गुहागरहून शृंगारतळीकडे जाणारी मारुती इको कार समोरून येत होती. गुहागर दिवाणी न्यायालयासमोर दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कानसरे यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि मदतकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कानसरे यांना उपचारासाठी कामथे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. मात्र गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. कामथे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

संजय कानसरे हे गुहागर परिसरात एक कुशल आणि प्रसिद्ध पेंटर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि व्यावसायिक कामामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.

सोमवारी गुहागर येथील चैतन्यभूमी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय कानसरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सांगळेवाडीसह संपूर्ण गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *