रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) मोठी कारवाई करत १० किलोहून अधिक वजनाचे अंबरग्रीस (Ambergris) जप्त केले आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून काही जण या प्रतिबंधित पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करणार असल्याची गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानक परिसरात १५ आणि १६ जून २०२६ च्या मध्यरात्रीनंतर विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. पहाटेच्या सुमारास संशयित रेनॉल्ट क्विड कार अडवून तिची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून तब्बल १० किलोपेक्षा अधिक वजनाचे अंबरग्रीस आढळून आले. याप्रकरणी वाहनातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या अनुसूची-१ मधील नोंद क्रमांक १६९ नुसार स्पर्म व्हेल हा संरक्षित प्राणी आहे. या प्राण्यापासून मिळणारे अंबरग्रीस हे प्रतिबंधित साहित्य मानले जाते. त्यामुळे या पदार्थाची खरेदी-विक्री, साठवणूक अथवा वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. याच कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार सीमाशुल्क विभागाने जप्तीची कारवाई केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अधिकृत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले.
ही कारवाई दापोली कस्टम्सचे अधीक्षक (प्रतिबंधात्मक व गुप्तवार्ता) अतुल पोतदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत अधीक्षक कविता नायर, रविकांत, निरीक्षक प्रतीक अहलावत, धीरज ओझा, नितेश शर्मा, मुख्य हवालदार सुहास विंळणकर, हवालदार करण मेहता, गौरव मौर्य, प्रशांत खोब्रागडे, सुखानी अमित पालशेतकर आणि लॉन्च मेकॅनिक किरण सागावकर यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, वन्यजीवांच्या अवैध व्यापाराविरोधात नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा प्रकारच्या तस्करीबाबत कोणतीही माहिती असल्यास ८४२११८८७५० या व्हॉट्सॲप अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कस्टम्स विभागाने केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल तसेच पात्र माहितीदारांना नियमानुसार बक्षीसही दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अंबरग्रीस म्हणजे काय?
अंबरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत तयार होणारा मेणासारखा पदार्थ आहे. समुद्रात तरंगत किनाऱ्यावर येणाऱ्या या पदार्थाला सुगंधी द्रव्यांच्या उद्योगात मोठी मागणी असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचते. याच कारणामुळे अंबरग्रीसची तस्करी करण्याचे प्रकार अधूनमधून उघडकीस येत असतात. मात्र भारतात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याचा व्यापार प्रतिबंधित आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













