मंडणगड : अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील संदेश, शिक्षकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा, अभ्यासाच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी अश्लील चॅट

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलवर आक्षेपार्ह व अश्लील संदेश पाठवून तिचा पाठलाग केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक अंकुश गर्जे (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित शिक्षकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यासह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षकाची पीडित विद्यार्थिनीशी ओळख तिच्या भावामार्फत झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने अभ्यासाच्या निमित्ताने विद्यार्थिनीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने विद्यार्थिनीच्या मोबाईलवर वारंवार अश्लील व अयोग्य आशयाचे संदेश पाठवले. तसेच तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या सततच्या त्रासामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली गेली होती. अखेर तिने धाडस करून आरोपीने पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट जतन केले आणि हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिला. संदेश पाहिल्यानंतर कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने विद्यार्थिनीला सोबत घेऊन १३ जुलै रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मंडणगड पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयित शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा हे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण असावे, अशी अपेक्षा असताना शिक्षकाकडूनच अशा प्रकारचे कृत्य झाल्याचा आरोप समोर आल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळा प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीच्या मोबाईलसह इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *