मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका नातेवाईकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मंडणगड पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०) याला तात्काळ अटक केली आहे. सडू सखाराम मोकाशी (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सडू मोकाशी आणि प्रकाश वाजे हे एकमेकांचे नातेवाईक असून दोघेही एकत्र काम करत होते. सोमवारी रात्री त्यांनी एकत्र मद्यपान केले. यावेळी सडू मोकाशी यांनी प्रकाश वाजे याला दारू कमी दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद त्यावेळी मिटला असला तरी प्रकाश वाजेच्या मनात त्याचा राग कायम राहिला.
मंगळवारी पहाटे सडू मोकाशी गाढ झोपेत असताना प्रकाश वाजे याने संधी साधून त्यांच्या डोक्यावर मोठा दगड घालून जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर गंभीर मार लागल्याने सडू मोकाशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खून करूनही आरोपी घटनास्थळावरून पळून गेला नाही. उलट तो तेथेच झोपून राहिला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनास्थळावरून संशयित प्रकाश वाजे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले असून, खुनासाठी वापरण्यात आलेला दगडही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीने नेमक्या कोणत्या कारणामुळे इतके टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. किरकोळ कारणावरून घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे मंडणगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













