लांजा : तरुणीला फूस लावून पळवल्याचा आरोप, लांजा पोलिस ठाण्यावर नागरिकांची धडक

banner 468x60

लांजा तालुक्यातील शिपोशी येथील एका तरुणीला एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत शिपोशी पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिकांनी मंगळवारी लांजा पोलिस ठाण्यावर धडक दिली. संबंधित युवकासह त्याला मदत करणाऱ्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नागरिकांनी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिपोशी येथील एका तरुणीला एका युवकाने प्रेमसंबंधांचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. संबंधित युवकाने तरुणीविरुद्ध षडयंत्र रचल्याचा तसेच तिच्यावर विविध प्रकारे दबाव आणल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

याप्रकरणी संबंधित युवकाला मदत केल्याचा संशय असलेल्या लांजा येथील काही युवकांचीही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी प्रकरणाची कायदेशीर बाजू तपासून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिकृत चौकशीनंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *