Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : ताईंना भाऊंची प्रतीक्षा, तलाठी भाऊसाहेब भरदुपारी कार्यालयात, महिला भर पावसात ताटकळत उभे

banner 468x60

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. चिपळूणमध्ये सोमवारी पहिल्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात महिला आणि कुटुंब प्रमुखांची गर्दी झाली होती.

मात्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयात तलाठी भाऊसाहेब न आल्याने दुपारपासून सायंकाळी उशीरापर्यंत अनेकांना तलाठी भाऊंची प्रतिक्षा करावी लागली.१ ते १५ जूलै या कालावधीत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे. मात्र या प्रस्तावात वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तसेच अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड , रेशनकार्ड, बँक पासबुक व फोटो सादर करणे आवश्यक आहे.

त्यानुसार वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सोमवारी पहिल्या दिवसापासूनच विविध ठिकाणच्या तलाठी कार्यालयात गर्दी झाली. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयातही महिलांसह कुटुंबातील सदस्यांनी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतू येथील तलाठी भाऊसाहेबांकडे चिपळूणसह कामथे गावचा अतिरीक्त कार्यभार असल्याने ते चिपळूण तलाठी कार्यालयात उशीरापर्यंत आले नाहीत.

त्यामुळे दुपारपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेक नागरिक कार्यालया बाहेर भर पावसात ताटकळत उभे होते. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता भाऊसाहेब येताहेत एवढेच सांगितले जात होते. अखेर काहीजण कंटाळून परत गेले. परंतू काही महिला व अन्य नागरिक कार्यालया बाहेरच सायंकाळी उशीरापर्यंत भाऊसाहेबांची वाट पहात उभे होते. या कार्यालयातील तलाठ्यांना अतिरीक्त कार्यभार दिल्याने शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय नियमीत होत आहे. तेव्हा या कार्यालयात पुर्णवेळ तलाठी मिळण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.

त्यामुळे आता तहसीलदार लोकरे हे याविषयी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अपात्र?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात्रताही निश्चित करण्यात आल्या आहेत. अपात्रतेचे आठ निकष निश्चित करण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे…
1) ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
3) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेतला असेल.
5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे.
6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत.
7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पहा यादी
1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.
4) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?
योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *