खेड : एसटी बसचा अपघात, सहा प्रवासी सुखरूप

banner 468x60

खेड आगारातून वडगाव-खेड मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला रविवारी दुपारी अस्तान-चाटव सीमेजवळ अपघात झाला. एमएच १४ बीटी २७५६ क्रमांकाची बस पुलाच्या अलीकडे अचानक घसरून रस्त्याच्या कडेला नदीच्या दिशेने गेल्याने काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने बसमधील सर्व सहा प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेड आगाराची वडगाव-खेड एसटी बस रविवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास सहा प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. अस्तान-चाटव सीमेजवळ पुलाच्या अलीकडे बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरली आणि नदीच्या दिशेने गेली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी परिस्थितीची पाहणी करत प्रवाशांची सुरक्षितता तपासली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटी प्रशासनानेही घटनास्थळी माहिती घेतली असून, बस चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *