खेड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी पावसात स्थानकासमोरील छतावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली असून, कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी तयार करून प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवला होता. मात्र, या घटनेनंतरही संबंधित विभाग आणि ठेकेदाराकडून तातडीने दखल घेण्यात आली नसल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातही रेल्वे स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली होती. त्यामुळे प्रवाशांना स्थानक परिसरात उभे राहणेही कठीण झाले होते. त्या वेळीही संबंधित ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा वादळी पावसात नव्याने बसवलेले पत्रे उडून गेल्याने नूतनीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच रेल्वे स्थानकावरील कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













