खेड : लोटे एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ संतप्त, संबंधित कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी

banner 468x60

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आज १७ जुलै (शुक्रवारी) सकाळी एका रासायनिक कारखान्यातून गेटमधून थेट उघड्यावर रसायने व रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र रासायनिक वायू पसरल्याने आजूबाजूच्या कारखान्यांतील कर्मचारी तसेच नजीकच्या गावांतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री दुर्गा ऑर्गेनिक्स हे दोन्ही रासायनिक कारखाने एकाच मालकाचे आहेत. संबंधित घटना घडली त्यावेळी कारखान्याच्या परिसरात मालक, व्यवस्थापक किंवा निर्णय घेण्याच्या अधिकारातील कोणतीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी किंवा तत्काळ उपाययोजना करण्यासाठी कारखान्याकडून कोणीही पुढे आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

रासायनिक वायूचा तीव्र वास परिसरात पसरल्यानंतर आजूबाजूच्या उद्योगांतील कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. ही बाब लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धाव घेतली. मात्र, कारखान्याच्या वतीने परिस्थितीची माहिती देण्यासाठी अथवा नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा प्रतिनिधी बाहेर आला नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच शेजारील विनंती ऑरगॅनिक या उद्योगाची सेफ्टी टीम आवश्यक सुरक्षा साहित्य आणि उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राथमिक उपाययोजना केल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कारखान्याचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक प्रदूषणाच्या घटना वारंवार घडत असून, काही उद्योगांकडून पर्यावरणीय नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. त्यामुळे परिसरातील हवा, पाणी आणि पर्यावरण धोक्यात येत असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित उद्योगांकडून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे का, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी), कारखाना निरीक्षक कार्यालयाने तसेच अन्य संबंधित यंत्रणांनी तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच चौकशीत नियमभंग आढळल्यास संबंधित कारखान्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून उत्पादन तात्काळ बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेसंदर्भात संबंधित कारखान्याची अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण वृत्त लिहिपर्यंत उपलब्ध होऊ शकलेले नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची अधिकृत यंत्रणांकडून चौकशी होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *