महाड : काळ नदीच्या पात्रात अडकलेल्या दोन तरुणांची थरारक सुटका; एनडीआरएफच्या धाडसी मोहिमेला यश

banner 468x60

महाड तालुक्यातील आकले गावाजवळील काळ नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या दोन तरुणांची एनडीआरएफ, महाड एमआयडीसी पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त बचाव मोहिमेद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली. रात्रीच्या अंधारात, वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत पार पडलेल्या या थरारक बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, आदिल शकील खान आणि नशीमुल्ला यतिमुल्ला खान हे दोघे बुधवारी सायंकाळच्या सुमारास आकले गावाजवळील काळ नदीच्या पात्रातील एका बेटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी परिसरात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आणि दोघेही बेटावर अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नदीतील पाण्याचा वेग आणि अंधारामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात येताच एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत सेठी यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाने अत्याधुनिक बचाव साहित्य, लाइफ जॅकेट, दोरखंड आणि विशेष बोटींच्या सहाय्याने नियोजनबद्ध मोहीम राबवली. वेगवान प्रवाहावर मात करत पथकाने दोन्ही तरुणांपर्यंत सुरक्षित पोहोचून त्यांना आवश्यक सुरक्षा साधने परिधान केली. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक दोघांनाही बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुखरूप सुटका झाल्यानंतर दोन्ही तरुणांनी बचाव पथकाचे आभार मानले. स्थानिक नागरिकांनीही एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले.

दरम्यान, सध्या रायगडसह कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्या, ओढे आणि धबधब्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रातील बेटांवर जाणे, पुराच्या पाण्यात उतरून धाडस करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांचे काटेकोर पालन करावे, अनावश्यक पर्यटन टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *