खेड शहरातील खेडजाई मंदिराजवळील शशिकांत दांडेकर यांच्या शेतात उपड्या अवस्थेत सापडलेल्या बाळू विठ्ठल वाले (वय ३२) यांच्या मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत मित्रपरिवाराने सखोल चौकशीची मागणी केली आहे.
याप्रकरणी २० मे रोजी खंडू विठ्ठल वाले यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या माहितीनुसार, बाळू वाले हे खेड येथे एका सिक्युरिटी ऑफिसमध्ये काम करत होते. काही दिवस कामावर न आल्याने ऑफिसमधून फोन आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र अधूनमधून घरच्यांना न सांगता बाहेर जाण्याची सवय असल्याने सुरुवातीला कुटुंबीयांनी काही दिवस प्रतीक्षा केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार देण्यासाठी गेल्यावर खेडजाई मंदिराजवळ एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.
घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर अंगावरील कपडे आणि डोक्यावरील टक्कल यावरून तो मृतदेह बाळू वाले यांचाच असल्याची खात्री झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बाळू वाले यांचे मित्र धनाजी साळुंखे यांनी या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता होण्याच्या दोन-तीन दिवस आधी बाळू यांचा खेड शहरातील काही तरुणांसोबत वाद झाला होता. त्या वादात त्यांनी संबंधितांपैकी एकाला कानशिलात लगावल्याचेही मित्रांना सांगितले होते. त्यामुळे या वादाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचा तपास व्हावा, अशी मागणी होत आहे.
वादानंतर बाळू वाले यांनी त्यांच्या रूमवर जाणे टाळले होते. पुढील काही दिवस ते बाहेरच राहत होते, अशी माहिती मित्रांनी दिली. त्यामुळे ते कोणाच्या भीतीखाली होते का किंवा त्यांच्यावर कोणता दबाव होता का, याबाबतही संशय व्यक्त होत आहे.
मित्रांच्या माहितीनुसार, बाळू वाले यांना दारूचे व्यसन होते. पगार झाल्यानंतर काही दिवस ते गायब राहत असत. मात्र यावेळी अनेक बाबी संशय निर्माण करणाऱ्या असल्याचे सांगितले जात आहे. १२ मे रोजी पगार न झाल्यामुळे त्यांनी सांगली येथील मित्रांकडून ५०० रुपये उसने घेतले होते. मित्र निखिल गोरे यांनी ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवली होती. त्यानंतर त्यातील २०० रुपये त्यांनी लक्ष्मीकांत भुते यांना यूपीआयद्वारे पाठवले होते.
त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर सुमारे २० हजार रुपयांचा पगार जमा झाला होता. मात्र त्यानंतर खात्यातून कोणताही व्यवहार झालेला नसल्याचे मित्रांनी सांगितले आहे. त्यामुळे खात्यात पैसे असताना बाळू अचानक बेपत्ता कसे झाले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाळू वाले हे खेड बसस्थानकाजवळील जप्त करण्यात आलेल्या एका प्रॉपर्टीवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. ते दीड महिन्यांपूर्वीच खेड येथे कामासाठी आले होते. याच काळात खेडमधील एका “ताई”ने त्यांना मदत केल्याचे ते मित्रांना सांगत होते. त्यामुळे ही “ताई” नेमकी कोण, याचाही शोध घेण्याची मागणी होत आहे.
मित्रांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या परिसरात दारूची बाटली, पाण्याची बाटली किंवा खाद्यपदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे बाळू स्वतः त्या ठिकाणी गेले होते की त्यांना तेथे आणण्यात आले होते, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
घटनास्थळावरील फोटोंवरून मृतदेह कुजला होता की जाळला गेला होता, असा गंभीर प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करणार असल्याचे धनाजी साळुंखे यांनी सांगितले.
बाळू वाले यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, वाद झालेली तरुण मंडळी कोण, मदत करणारी “ती ताई” कोण आणि या प्रकरणामागे आणखी कोणते धागेदोरे आहेत का, याचा उलगडा करण्याची मागणी आता मित्रपरिवाराकडून जोर धरू लागली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













