Breaking News

खेड : गावठी बॉम्ब स्फोटप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे एका पडीक जागेत अज्ञात व्यक्तीने निष्काळजीपणे ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वसई येथील बारुडा नगर, फुलपाडा रोड परिसरात राहणाऱ्या पल्लवी प्रताप येसरे (वय ३५) या आपल्या कुटुंबासह मुरडे गोठलवाडी या मूळ गावी आल्या होत्या. त्यांच्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्या गावी मुक्कामी होत्या. दरम्यान, त्यांचा १३ वर्षीय मुलगा प्रणव प्रताप येसरे आणि त्याची बहीण हे दोघे आपल्या काकांच्या मालकीच्या बकऱ्या चरवण्यासाठी गावातील एका पडीक जागेत गेले होते.


सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास बकऱ्या चरत असताना प्रणवला त्या जागेत एक संशयास्पद वस्तू आढळली. ती वस्तू नेमकी काय आहे याची कल्पना नसल्याने त्याने ती खेळण्याच्या उद्देशाने उचलली आणि काही अंतरावर फेकून दिली. मात्र ती वस्तू प्रत्यक्षात गावठी बॉम्ब असल्याने जमिनीवर पडताच त्याचा मोठा स्फोट झाला.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की प्रणव गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि ओठांवर गंभीर जखमा झाल्या असून तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. स्फोटकाचे बारीक कण उडाल्याने त्याचे डोळे लाल झाले. तसेच दोन्ही हात, छाती आणि पोटावरही जखमा झाल्या आहेत. स्फोटाचा आवाज परिसरात घुमल्याने नागरिक घटनास्थळी धावले.

घटनेनंतर जखमी प्रणवला तात्काळ उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय पथक सतत लक्ष ठेवून आहे.

या प्रकरणी पल्लवी येसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम १२५ (अ), १२५ (ब), २८८ तसेच भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ मधील कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधित गावठी बॉम्ब अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीररीत्या आणि अत्यंत निष्काळजीपणे त्या ठिकाणी ठेवला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अशा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यांना हात न लावता त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गावठी स्फोटकांसारख्या धोकादायक वस्तूंमुळे निरपराध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची ही घटना गंभीर जाणीव करून देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *