चिपळूण तालुक्यातील कटरे स्टॉप येथील नाक्यावरील पिकअप शेडमध्ये झालेल्या वादातून एका ४७ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. संतोष बबन होवळे (वय ४७, रा. कटरे चिंचवाडी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वैभव विजय शिर्के (रा. कटरे खालचे आवाड) याच्याविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कटरे स्टॉप येथील नाक्यावरील पिकअप शेडमध्ये फिर्यादी संतोष होवळे, साक्षीदार सचिन साळवी, हेमंत चिनकटे आणि संशयित आरोपी वैभव शिर्के हे बसले होते.
यावेळी संशयित वैभव शिर्के याने तळवडे येथील गरव हे कटरेकरांबाबत अपमानास्पद बोलत असल्याचे सांगितले. त्यावर संतोष होवळे यांनी, त्यांना तेथेच जाऊन विचारायला हवे होते, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. फिर्यादी यांनी आरोपीला आपल्याला काही सांगू नको, असे म्हटल्याने त्याचा राग आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने संतोष होवळे यांना जोरात ढकलले आणि लाथ मारली. एवढ्यावरच न थांबता तेथे पडलेला लाकडी दांडका उचलून त्यांच्या डाव्या कानाच्या पाळीवर मारला. या प्रहारामुळे त्यांच्या कानाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या सचिन साळवी आणि हेमंत चिनकटे यांनी मध्यस्थी करून संतोष होवळे यांना आरोपीच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी संतोष होवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१) आणि ११५(२) प्रमाणे वैभव शिर्केविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













