Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

लांजा : जमीन-जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, तिघेजण जखमी, एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल

banner 468x60

जमीन-जागेच्या वादातून शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना लांजा तालुक्यातील शिपोशी जाधववाडी येथे बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत धोंडू जाधव (वय ५५, रा. शिपोशी जाधववाडी, ता. लांजा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरासमोर होते. त्यावेळी मुलगा श्रवण कामाला जात नसल्याच्या कारणावरून ते पत्नी आणि मुलाला रागाच्या भरात शिवीगाळ करत होते. तसेच संजय शंकर डाफळे यांनी आपल्या वडिलांकडून जमीन फसवून घेतल्याचे बोलत असताना या विषयावरून वाद निर्माण झाला.

याच गोष्टीचा राग मनात धरून संजय डाफळे यांनी श्रीकांत जाधव यांच्याशी वाद घातला. ‘तू भाई झाला आहेस का?’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दमदाटी करून हातातील काठीने श्रीकांत जाधव यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, पतीला होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी पत्नी श्रावणी जाधव या मध्ये पडल्या असता त्यांच्या हाताला आणि पायाला काठी लागून दुखापत झाली. या घटनेत श्रीकांत जाधव आणि त्यांची पत्नी श्रावणी हे दोघे जखमी झाले.

या प्रकरणी श्रीकांत जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय शंकर डाफळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याच घटनेबाबत संजय शंकर डाफळे (वय ५२, रा. शिपोशी जाधववाडी, ता. लांजा) यांनीही पोलिसांत स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्रीकांत जाधव हे दारू पिऊन त्यांना शिवीगाळ करत होते. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी देत होते. याबाबत विचारणा केली असता वाद अधिक वाढल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संजय डाफळे हे आपल्या मालकीची गुरे गोठ्यात बांधून घरी जात असताना श्रीकांत जाधव यांनी पाठीमागून येऊन डोक्यात कोयत्याने वार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यात संजय डाफळे जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संजय डाफळे यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी श्रीकांत धोंडू जाधव यांच्याविरोधातही भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमीन-जागेच्या वादातून सुरू झालेल्या या भांडणाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. एकाच घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप करण्यात आले असून, पोलिसांकडून दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे करत आहेत.