गुहागर : बंद घरातून तब्बल 1 लाख 71 हजारांचा ऐवज लंपास; चोरट्यांनी कडी-कोयंडा न तोडताच केली चोरी

banner 468x60

गुहागर तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ७१ हजार ४२ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घराच्या कडी-कोयंडा, खिडकी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी तोडफोड न करता चोरी केल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही चोरी १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत वेळंब, गुरववाडी येथे घडली. याप्रकरणी पूनम गजानन गुरव (वय ३४) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या घरातील पर्समध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. चोरी करताना घरातील कडी-कोयंडा, खिडकी अथवा इतर कोणत्याही वस्तूची मोडतोड झालेली आढळून आलेली नाही.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ३३.३९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅम सोन्याची साखळी, सोन्याची आणखी एक साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याचे झुमके, दोन नथ, चांदीच्या दोन साखळ्या, दोन चांदीच्या कमरेच्या साखळ्या, चांदीचे कडे तसेच ४ हजार ३०० रुपये रोख यांचा समावेश आहे.

या सर्व ऐवजाची एकूण किंमत १ लाख ७१ हजार ४२ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) तसेच घरातील चोरीसंदर्भातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घरात कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता चोरी झाल्याने चोरट्यांना घराची माहिती होती का, या दिशेनेही तपास होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *