गुहागर : 12 वर्षांनंतर गोल्डनमॅन विश्वास खरे हत्याकांडाचा निकाल, पुण्यातील दोन आरोपींना जन्मठेप, 2014 ला विळा आणि सुऱ्यानी 21 वार करत गळा चिरून केली होती हत्या

banner 468x60

गुहागर येथील बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ तसेच कासव संवर्धनासाठी ओळख असलेले विश्वास महादेव खरे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखेल, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, पुणे) यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ व ३९४ सह ३४ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

banner 728x90

विश्वास खरे यांची १ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील त्यांच्या ‘खरे प्लेझर पॉईंट’ या होमस्टेमध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने पर्यटक म्हणून आलेल्या आरोपींनी खरे यांच्या गळ्यातील सुमारे दहा तोळ्यांची सोन्याची साखळी लुटण्यासाठी विळा व सुरा यांसारख्या धारदार शस्त्रांनी तब्बल २१ वार केले. त्यानंतर त्यांचा गळा चिरून हत्या करून आरोपींनी सोन्याची साखळी घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेने संपूर्ण कोकण हादरला होता.

घटनेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला आरोपींचा कोणताही मागमूस लागत नसल्याने तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुहागर पोलिसांनी तांत्रिक माहिती, परिस्थितीजन्य पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या तीन महिन्यांत आरोपींचा शोध घेत जानेवारी २०१५ मध्ये त्यांना अटक केली.

या प्रकरणात आरोपींना माहिती पुरविल्याच्या आरोपावरून विष्णू किसन तनपुरे (रा. दिघी, पुणे) यालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण तपास पूर्ण करून दोषारोपपत्र तत्कालीन खेड सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. पुढे हा खटला चिपळूण सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. या खटल्यात एकूण ५१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मयताचे बंधू गोविंद खरे, विवेक खरे, पत्नी विद्या खरे, आरोपींना मोटारसायकलवर जाताना पाहणाऱ्या शर्मिला घुमे, चोरीची सोन्याची साखळी खरेदी करणारा सोनार विरसिंह चौहान, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, हस्ताक्षर तज्ज्ञ विनोद मेश्राम तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे नोडल अधिकारी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.

खटल्यादरम्यान काही महत्त्वाचे पंचसाक्षीदार आणि सोनार फितूर झाले होते. मात्र अॅड. साळवी यांनी प्रभावी उलटतपासणी करून सरकार पक्षाची पुराव्यांची साखळी अबाधित ठेवली. मोबाईल टॉवर सीडीआरमधून आरोपी घटना घडली त्यादिवशी गुहागरमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी अमोल गाढवे याने चोरीची सोन्याची साखळी विकल्याचेही पुराव्यांद्वारे सिद्ध करण्यात आले. या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींनीच विश्वास खरे यांचा खून केल्याचा निष्कर्ष नोंदवला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन गुहागर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला होता. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचे ठरले.

विशेष म्हणजे, जवळपास १२ वर्षे प्रलंबित असलेला हा बहुचर्चित खटला चिपळूण येथे नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी सलग सुनावणी घेत अवघ्या बारा दिवसांत निकाली काढला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांनी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

या निकालानंतर विश्वास खरे यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. कठोर शिक्षेमुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया सरकारी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांना वेळेवर न्यायालयात उपस्थित ठेवण्यासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी विशेष सहकार्य केले. तसेच पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार प्रदीप भंडारी आणि आशिष शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *